शरीराच्या वाढलेल्या वजनाचे दुष्परीणाम

एका मित्राचा अचानक फोन आला. अगदी १० वर्षांनी त्याच्याशी बोलणे झाले असावे. सध्या तो नगर मध्ये नसतो. पण गावच्या यात्रेसाठी गावी आला होता व जाताना एकदा भेटुन जावे म्हणुन सहज फोन केला. भेटण्यासाठी जवळच्याच  एका हॉटेल मध्ये गेलो.

कॉलेजच्या दिवसातील, तो अगदी तरबेज हुशार आणि चपळ मुलगा. आमच्या ग्रॅड्युएशन च्या काळात, तो नेहमी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घ्यायचा. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वेगवेगळ्या मैदाने खेळातही तो पुढे असायचा. ग्र्र्ड्युएशन नंतर त्याने कसला तरी सॉफ्टवेयर चा कोर्स साठी ॲडमिशन घेतले, तेव्हापासुन तो भेटलाच नव्हता. त्याला भेटल्यावर समजले सध्या तो बॅंगलोरला असतो व क्वचितच पुण्यातही येत असतो. आमच्या कॉलेजच्या दिवसांत, तो एक साधारण वजन असणारा तरुण होता. पण आता त्याचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले होते.  व त्याही पेक्षा भयानक दिसत होती त्याच्या मानेवरील काळवंडलेली त्वचा.

मी सध्या फिटनेस कोच म्हणुन काम करतो हे देखील त्याला माहीत नव्हते. भेटल्यावर लगेचच धोक्याची घंटा माझ्या कानापाशी वाजु लागली. ब-याच वर्षांनी भेटत असल्यामुळे, आधी जुन्या, इतक्या वर्षांच्या सगळ्या गप्पा मारुन झाल्या. निघायच्या वेळेस मात्र मी न राहवुन त्यच्याशी ह्या विषयावर बोललोच. त्याला मानेवरील काळवंडलेल्या त्वचेविषयी विचारले तर त्याला माहीत नाही स्कीन अशी काळी का झाली असे उत्तर दिले. मग त्याला विचारले की तुझ्या काखेमध्ये मोस किंवा मोल आहेत का? त्यावर तो हो म्हणाला. आता मी त्याचा चांगलाच क्लास घेतला. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच मी, त्याला त्याचे कॉलेजमधील जीवन आणि शरीरयष्टी कशी होती याची आठवण करुन दिली. अचानक साक्षात्कार व्हावा तसा तो खडबडुन जागा झाल्यासारखा मला म्हणाला, सुनिल आता काय करु ते सांग. सर्वात आधी मी त्याला काय करु नये ते सांगीतले व नंतर काय करावे ते सांगितले. गेला तो पुन्हा बॅंगलोर ला.

एका घरगुती कार्यक्रमामध्ये, मनिषा आमच्या एका लांबच्या नात्यातील एका स्त्रीला भेटली. गप्पा मारता मारता मनिषाला, त्या स्त्रीच्या मानेवरदेखील काळे चट्टे दिसले. अर्थात त्या स्त्रीचे वजन देखील वाढलेलेच होते.

तिसरी व्यक्ति मला दोन वर्षापुर्वी भेटली अशाच प्रकारची लक्षणे असणारी. एक आई, जी शिक्षिका आहे, तिच्या आठ वर्षाच्या मुलाला माझ्या कडे घेऊन आली. त्या मुलाचे वजन त्याच्या वयाला न शोभणारे होते. आणि सर्वात लक्षणीय बाब म्हणजे त्याच्या ही मानेवर, काळंवडली त्वचेचे पट्टे होते.

अशी उदाहरणे मला नेहमीच दिसत असतात.

वजन वाढलेल्या व्यक्तिंमध्ये, त्वचेच्या विकारांची कारणे बरीच असु शकतात. वर म्हंटल्याप्रमाणे, मानेवरील त्वचा अशी काळवंडणे, यास इंग्रजीमध्ये ॲकॅन्थॉसिस नायग्रिकन असे म्हणतात. व हे प्रामुख्याने आपल्या शरीरातील हार्मोन्स च्या बदलामुळे होत असते. मानेवरील ही त्वचा काळसर आणि जाड होते. जिथे जिथे त्वचा मुडपते, तिथे ही काळवंडलेली त्वचेची घडी लगेच दिसते. मानेवर असल्यामुळे, अगदी आरसा घेऊन, जाणीवपुर्वक पाहील्या शिवाय,  स्वतःला शरीराचा हा भाग शक्यतो दिसणार नाही, त्यामुळेच अशा लक्षणाकडे आपले लक्ष जाण्यास खुप वेळ लागतो.

मानेवरील ह्या लक्षणासोबतच वाढलेल्या वजनामुळे अन्य त्वचा विकारदेखील होऊ शकतात. उदा गुडघ्याच्या मागील व पोट-यामधील रक्तवाहीन्या मध्ये द्रव जमा होणे व त्या फुगणे. त्यामुळे पाय सुजणे, छोट्या रक्तवाहीन्या फुटणे, आणि पुढे जाऊन आल्सर सारखा भयानक आजार देखील होऊ शकतो.

आणखी ही अनेक विकार आहेत जे वाढलेल्या वजनामुळे होऊ शकतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाढलेले वजन तुमच्या तील तारुण्य क्षणाक्षणाला कमी करते. तुमचा एखादा जुना फोटो शोधुन काढा, शक्यतो तुमच्या करीयरच्या सुरुवातीचा. आणि त्यावेळचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही यांची तुलना करुन बघा. तुम्हाला जाणवेल की तुम्ही तुमच्या शरीरावर किती अन्याय केलेला आहे.आपल्या जुन्या फोटोत, आपल्याच डोळ्यात चमक, चेह-यावर तेज पाहुन, तुम्ही चुकुनही असे वाटुन घेउ नका की गेले ते दिवस…कारण हे तेज माघारी आणता येते. तुम्ही पुन्हा पहील्यासारखे, हुशार, राजबिंडे दिसु शकता. पण त्यासाठी तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करावे लागेल.

आयुष्य खुप सुंदर आहे. आणि ही सुंदरता अनुभवण्यासाठी तितके सुंदर आणि निरोगी शरीर असणे गरजेचे आहे. उठा, आजच संकल्प करा की तुम्ही सुंदर आणि निरोगी व्हालच.

तुमचा निरामय आयुष्याचा सांगाती,

सुनिल कोरडे – 98903 93341

मनिषा कोरडे 9922830541

अहमदनगर

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X