आर्थिक आरोग्य – सुखी जीवनाची गुरुकिल्ली

हल्ली लोकांची आरोग्यविषयक जागृती वाढू लागली आहे हे एक चांगले लक्षण आहे.पण यामध्ये फक्त शारीरिक आरोग्याचाच विचार केला जातो. माणसाच्या दृष्टीने तीन प्रकारची आरोग्ये महत्वाची आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत.

१) शारीरिक आरोग्य ( Physical Health )
२) मानसिक किंवा भावनिक आरोग्य ( Mental or Emotional Health )
३) आर्थिक आरोग्य ( Financial Health )

ज्या व्यक्तींची किंवा कुटुंबाची तीनही आरोग्ये उत्तम असतील त्यांची भरघोस प्रगती होते असे दिसून आले आहे. यातील एक जरी आरोग्य बिघडले तरी प्रगतीला खीळ बसू शकते, प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे वरील तीनही आरोग्ये उत्तम ठेवणे अवश्यक आहे.

आर्थिक आरोग्याचा फार जवळचा संबंध शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी आहे. चिता माणसाला एकदाच जाळत असते, पण चिंता माणसाला आयुष्यभर जाळत असते हे सर्वांनाच ठाऊक आहे! चिंतेचे किंवा काळजीचे मुख्य कारण बहुतांशी आर्थिक विवंचना असतात असे आढळून आले आहे. त्यामुळे या चिंता किंवा काळज्या दूर करण्यासाठी आर्थिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे.

माणसे हल्ली शारीरिक आरोग्याची काळजी घेऊ लागले आहेत. त्यासाठी ते नियमित व्यायाम, पथ्य पाणी, योग्य आहार, नियमितपणे आरोग्याची तपासणी, वेळच्या वेळी औषध पाणी या सारख्या गोष्टी करत असतात. काहीजण मानसिक किंवा भावनिक आरोग्याची काळजी घेताना दिसतात. त्यासाठे चांगले वाचन करणे, चांगले विचार ऐकणे, चांगले छंद जोपासणे, चांगल्या कार्याला वाहून घेणे, धार्मिक प्रवचने ऐकणे, चांगले मित्र मैत्रिणी गोळा करणे यांसारखे उपाय करत असतात. पण आर्थिक अरीग्याची म्हणावी त्या प्रमाणात काळजी घेतली जात नाही.

आर्थिक अरीग्याविषयी लोकांमध्ये अनेक समाज गैरसमज आहेत. भरपूर पैसे मिळवले किंवा भरपूर पैसे वाचवले म्हणजे आर्थिक आरोग्य उत्तम आहे असे समजले जाते. परंतू ते नेहमी बरोबर असेलच असे नाही. महिना ५०,००० रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीचे आर्थिक आयुष्य बिघडलेले असु शकते. तर महिना ५,००० रुपये उत्पन्न असलेल्या माणसाचे आर्थिक आरोग्य चांगले असु शकते. त्यामुळे आर्थिक आरोग्य हा प्रकार माणसाच्या उत्पन्नाशी निगडीत नसून तो त्याच्या विचारांशी, सवयींशी, व संस्कारांशी निगडीत आहे.

त्यामुळे प्रत्येकाने आपले आर्थिक आरोग्य कसे आहे हे तपासून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आर्थिक आरोग्य म्हणजे काय, ते सुधारणे शक्य आहे का हे समजावून घेणे आवश्यक आहे.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X